काय सांगता ! होय, पाकिस्तानच्या संसदेत उघडलं जातंय ब्युटी पार्लर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानची अर्थव्यवस्था गडगडायला लागली असताना तेथील सत्ताधारी आणि खासदार स्वत:ला आवर घालू शकत नाहीयेत. आता पाकिस्तानच्या संसद परिसरासाठी काही घोषणा करण्यात आल्या आहेत ज्याने पाकिस्तानी नागरिक देखील हैराण झाले आहेत.

पाकिस्तानच्या संसद परिसरात महिला खासदारांसाठी ब्यूटी पार्लर सुरु करण्याचा घाट घातला जात आहे, तसा आदेश देखील वजीर-ए-आजम इमरान खान यांनी दिला आहे. सिनेटच्या एका समितीने इस्लामाबादच्या एका सिविक एजेंसीला संसदेच्या परिसरात ब्यूटी पार्लर सुरु करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानी माध्यमांच्या मते, समितीत सहभागी असलेल्या महिला सदस्यांनी हा मुद्द उचलून धरला होता. सीनेटच्या समितीची बैठक संसदेत भवन परिसरात झाली आणि या बैठकीत ब्यूटी पार्लर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

एवढेच नाही तर समितीने राजधानी विकास प्राधिकरणाला फटाकरले की त्यांच्या निर्देशानंतर देखील अद्याप महिला खासदारांसाठी संसद परिसरात ब्यूटी पार्लर का सुरु केले नाही. अहवालानुसार सीनेटर कुलसूम परवीन यांनी समितीत सांगितले की समिती संयोजकांचे स्पष्ट निर्देश होते की ब्यूटीपार्लरसाठी जागा निश्चित केली जावी आणि सीनेटर समीना सईद यांना संपर्क साधा. समितीच्या चेअरमन सलीम मांडीवाला यांनी त्यासाठी दोन सीनेटरचे नाव दिले होते, ज्यांच्याशी सल्लामसलत करुन प्राथमिकता पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

रोजच्या वस्तू खरेदी करण्यासाठी स्टोर देखील संसदेच्या आवारात सुरु करण्यात आले आहे. पाकची अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना हे निर्णय थोडे धक्कादायकच आहेत. 2007 – 2008 साली पाकमध्ये महागाईचा दर 17 टक्के होता. जानेवारीत पाकमध्ये महागाईच्या दराने 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. महागाई वाढून आता 14.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. पाक वजीर-ए-आजम पंतप्रधान इमरान खान यांनी देखील ही बाब स्वीकारली आहे.

इमरान खान यांनी नुकतेच यावर भाष्य केले होते की, सामान्य लोक आणि नोकरदार या कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत आणि लोकांच्या रोजच्या जीवनातील वस्तूंच्या किंमती कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.