मंत्रिपदाच्या वाटेत पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या : आ. विनायक मेटेंचे वक्तव्य

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – पंकजा मुंडे यांनी सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे कारस्थान त्यांनी रचले. आम्हाला विरोध आणि आमच्या विरोधकांना मदत केली. माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. बीड येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. दुष्काळातही शेतकऱ्यांसोबत गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा, शेतकरीपुत्राच्या पाठीशी शिवसंग्रामची ताकद उभी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिवसंग्राम संपविण्याचे कारस्थान रचले –

पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या कोंडीने राज्यात भाजपसोबत परंतु बीडमध्ये प्रचार करणार नाही अशी दुहेरी भूमीका घेणाऱ्या शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटेंनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. भाजप श्रेष्ठींनी शिवसंग्रामची भूमिका चालणार नाही असे स्पष्ट केल्यानंतर मेटे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी पंकजा मुंडेंवर टीका करताना मेटे म्हणाले की, ‘माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पालकमंत्री पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या. सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे कारस्थान त्यांनी रचले. आम्हाला विरोध आणि आमच्या विरोधकांना मदत केली. तसेच दुष्काळी परिस्थितीत आम्ही सांगितलेल्या ठिकाणी छावण्या आणि टँकरसुद्धा मिळू दिले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन आम्ही जिल्हा परिषदेत मदत केली, त्याठिकाणी देखील आम्हाला संपविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण होत असल्यामुळे बीडच्या निवडणुकीत शिवसंग्रामची संपूर्ण ताकद शेतकरी पुत्राच्या पाठीशी उभी करा.’

भाजप सरकारचा घटक पक्ष असलेला विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष आणि पंकजा मुंडे यांच्यात कायमच दुरावा राहिलेला आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष होता. त्यावेळी त्यांनी बीडमधून विधानसभेची निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली होती.