Coronavirus : ‘या’ मजुरानं केला ‘कारनामा’, महाराष्ट्राचं ‘मन’ जिंकलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम  –   कोरोनाच्या लढ्यासाठी अनेकांकडून मदत केली जात आहे. असाच एक मोठेपणा मजूराच्या मुलाने दाखवित कोरोनासाठी मदत केली आहे. . बीड जिल्ह्यातील चाटगाव येथील रेल्वेच्या कामात मजुरी करणार्‍या कुटुंबातील आठ वर्षाच्या चिमुकल्या संविधान दीपक गडसिंग याने बक्षिसाची 10 हजार रुपये रक्कम कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे.

संविधान याने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी ’तुझ्या संविधान या नावातच सर्वकाही आहे,’ अशा शब्दात धनंजय मुंडेंनी संविधान व त्याच्या कुटुंबियांचे कौतुक केले.

बीड जिल्ह्यातील चाटगाव येथील तलावात एका शाळकरी मुलीला पाण्यात बुडण्यापासून संविधानने मोठ्या हिमतीने वाचवले होते. त्यावेळी जिल्ह्यासह राज्यभरातून संविधानचे कौतुक करण्यात आले होते. त्याचबरोबर त्याच्या या बहादुरीबद्दल अनेकांनी त्याला रोख बक्षीसही दिले होते. बक्षिसातून गोळा झालेली दहा हजार रुपये रक्कम संविधानने आज या संकटाशी सामना करत असलेल्या राज्य सरकारला देऊन त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी त्याने केली आहे. संविधानचे वडील दीपक गडसिंग हे बीड परळी रेल्वेमार्गावर मजुरी करतात. घरची परिस्थिती तशी नाजूकच; तरीही त्याने व त्याच्या कुटुंबाने दाखवलेले हे औदार्य वाखाणण्याजोगे व समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित करणारे आहे.