तलाठ्यास अटक : शेतजमिनीचा फेर ‘ऑनलाइन’ करण्यासाठी १ हजाराच्या लाचेचे ‘बक्षीस’ !

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शेतजमिनीचा फेर ऑनलाइन करून दिल्याबद्दल बक्षीस म्हणुन एक हजाराच्या लाचेची मागणी करून ती लाच स्विकारणार्‍या तलाठयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली आहे.

हरिदास नामदेव काकडे (४४, तलाठी सज्जा – हिंगनगाव, ता. गवेराई, जि. बीड) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय शेतकर्‍याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार शेतकर्‍याच्या जमिनीचा फेर ऑनलाइन करून देण्यासाठी तलाठी काकडेने एक हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदविली. तक्रारीची खातरजमा करण्यात आली. बुधवारी दुपारी तलाठी हरिदास काकडेने सरकारी पंचासमक्ष तक्रारदार शेतकर्‍याकडून एक हजाराची लाच स्विकारली. त्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

बीड अ‍ॅन्टी करप्शन पोलीस निरीक्षक गजानन वाघ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सापळा रचुन ही कारवाई केली आहे. केवळ फेर ऑनलाइन करून दिल्यानंतर बक्षीस म्हणून एक हजाराची लाच तलाठयाकडून मागण्यात आल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.