७० हजाराच्या लाच प्रकरणी तहसील कार्यालयातील कारकुनाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – वाळुची तस्करी करताना पकडलेली वाळुची हायवा गाडी सोडून देण्यासाठी १ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती ७० हजार रूपयांवर सेटलमेंट करणार्‍या तहसिल कार्यालयातील कारकुनाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कारकुनाने तब्बल १ लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून ७० हजारावर तडजोड केल्याने जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुबोध विजयकुमार जैन (गेवराई, वर्ग- ३, जैन मंदिर गल्‍ली, मेन रोड, गेवराई) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराचा पकडलेली वाळुची हायवा गाडी सोडविण्यासाठी तहसिल कार्यालयातील कारकुन जैन यांनी त्यांच्याकडे एक लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बीडच्या अ‍ॅन्टी करप्शनच्या कार्यालयात दि. २७ एप्रिल रोजी तक्रार दिली. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा करण्यात आली. दि. २७ एप्रिल रोजी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी कारकुन सुबोध जैन यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लाच त्यावेळी स्विकारली नाही. जैन यांनी लाचेची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्‍न झाले असल्याने दि. ५ जून रोजी त्यांच्याविरूध्द गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like