भरधाव ट्रकची 2 रिक्षा, मोटारसायकलला धडक; 5 जण ठार 10 जण जखमी, दोघे गंभीर

बीड : बीड – परळी रोडवर एका सरकी वाहून नेणार्‍या भरधाव ट्रकने एका मागोमाग दोन रिक्षा, एका मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

बीड-परळी रोडवर मोची पिंपळगाव परिसरात प्रथम हा अपघात झाला. त्यानंतर ट्रकचालकाने तेथून पळ काढला. नंतर बीड ते वडवणी रोडवरील घोडका राजुरीजवळ एका दुचाकी व नंतर मालवाहू रिक्षाला धडक दिली. त्यानंतर हा ट्रक उलटला व ट्रकचालक पळून गेला.

सरकी वाहून नेणार्‍या या भरधाव ट्रकने वडवणीकडून बीडकडे येणार्‍या एका प्रवासी रिक्षाला मोची पिंपळगावजवळ जोरात धडक दिली. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये रिक्षातील तब्बसूम पठाण, रिहान पठाण (वय १३), तमन्ना अबजान पठाण (वय ८), शारो सत्ता पठाण, मदिना पठाण (सर्व रा. शाहूनगर, बीड) यांचा समावेश आहे. रिक्षाचालक सिद्धार्थ शिंदे व त्याचा भाऊ अविनाश शिंदे (दोघे रा. ढेकणमोहा, ता. बीड) तसेच प्रवासी जाईबाई कदम (रा. काळवाडी), मुजीब कुरेशी, अश्विनी गोविंद पोकळे (रा. देवळा), गोरख खरचाडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातानंतर ट्रकचालकाने तेथून पळ काढला. पुढे त्याने घोडका राजुरीजवळ एका दुचाकीला धडक दिली. त्यात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर लाकडे वाहून नेणार्‍या एका रिक्षाला धडक दिली. त्यात तीन जण जखमी झाले आहेत. त्यानंतर काही अंतर गेल्यावर ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला व चालक ट्रक सोडून पळून गेला. रिक्षामधील दोघा जखमींना औरंगाबाद येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.