‘कोरोना’ग्रस्त व्यक्तीच्या पार्थिवाची अहवेलना, नागरिकांनी रोखला अंत्यविधी

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे संक्रमण अधिक प्रमाणात होत आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित मृत रुग्णाचा अंत्यविधी गावकर्‍यांनी रोखल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे गुरुवारी घडली आहे. यामुळे गावकर्‍यांनी मृत कोरोनाग्रस्त रूग्णाच्या पार्थिवावर योग्य अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंबेजोगाई येथील स्वराती रुग्णालयात उपचार घेणार्‍या दोन व्यक्तीचा बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्यावर अंबाजोगाई शहरातील बोरुळा तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, संतप्त नागरिकांनी कोरोनाग्रस्त व्यक्तीचा अंत्यविधी रोखला होता. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अंबाजोगाईत नागरी वस्तीत असलेली बोरूळ स्मशानभूमी सार्वजनिक असून शहरातील 70 टक्के अंत्यविधी या ठिकाणी होतात. दहाव्याचे कार्यक्रम देखील नियमित होतात. येथील तलावावर कपडे धुण्यासाठी आजूबाजच्या महिलांची सतत वर्दळ असते.

तसेच, हे ठिकाण स्वराती रूग्णालयापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी मृतदेह आणण्यासाठी गावातून वर्दळीच्या रस्त्याने यावे लागते. त्यामुळे संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणी कोरोनाग्रस्त मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी मागणी नागरिकांनी यापूर्वीच केली होती. कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर 24 तास झाले तरी दोन्ही पार्थिवांवर अंत्यसंस्कार झाले नाहीत.

दरम्यान, कोरोना विषाणूने मराठवाड्यात एकाच दिवशी 15 बळी घेतले आहेत, बीड, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू कोरोनाची लागण झाल्याने झाला आहे. तर, हिंगोलीत 7, जालना 100, बीड 26, उस्मानाबाद 20, परभणी 26 तर नांदेड जिल्ह्यात 32 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

योग्य अंत्यसंस्कारसाठी पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता
काही ठिकाणच्या रूग्णालयातून बिल भरल्याशिवाय पार्थिव दिल्या नसल्याची घडना समोर आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रूग्णाच्या पार्थिवावर योग्य पध्दतीने अंत्यसंस्कार व्हावेत, यासाठी प्रशासनाने योग्य पर्याय व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. जेणेकरून त्या पार्थिवावर योग्य पध्दतीने अंत्यसंस्कार होतील आणि पार्थिवाची अहवेलना देखील होणार नाही. पण, आता प्रशासन याची दखल घेणार की नाही? याकडे लक्ष लागले आहे.