बीड : लग्नाला नकार दिला म्हणून 24 वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

जखमी मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – एका विवाहित महिलेने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाने तिच्या डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून बीड जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी पेठ बीड भागात घडली.

सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव असल्याचे जखमी महिलेने सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पीडित महिला बीड शहरातील पेठ बीड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी भागात राहते. ही घटना शनिवारी सायंकाळी 6 वाजता घडली. यावेळी पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की मागील एक वर्षापासून सुनील दत्तात्रय जाधव हा मुलगा मला छेडछाड करतो यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याला आम्ही तक्रार दिली होती पोलिसांनी सुनील जाधव यांना पोलिस ठाण्यात बोलावून एक वेळा समजावूनही सांगितले आहे. तरी देखील तो माझी सतत छेड काढत आहे. त्याच्या छेडछाडी मुळे मी माझे ब्युटी पार्लरचे क्लास देखील अर्ध्यावर सोडलेले आहेत. अशी कैफियत जखमी महिलेने व्यक्त केली.

माझ्या मुलीच्या जीवितास धोका आहे : मुलीचे वडील

मारहाण झालेल्या महिलेचे लग्न झालेले आहे. व रीतसर घटस्फोट देखील झालेला आहे. आता ती तिच्या वडिलांकडे राहते. ‘मागील एक वर्षभरापासून सुनील जाधव हा माझ्या मुलीला सतत छेडतो व आता तर त्याने डोक्यात दगड घालून मारून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मुलीच्या जीवितास धोका असून याची दखल बीड पोलिसांनी घ्यावी, अशी मागणीही संबंधित जखमी महिलेच्या वडिलांनी केली आहे.

आरोपी सुनील जाधव याला पेठ (बीड) पोलिसांनी साडेबाराच्या सुमारास ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हे करीत आहेत.