बीड/केज : पोटाच्या आजाराला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

पोलिसनामा ऑनलाईन टीम : तालुक्यातील आडस येथे एक धक्कादायक घटना घडली. येथील एका शिक्षकाने आपल्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही घटना सोमवारी (ता.२५) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्या शिक्षकाने पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी आत्महत्यापूर्वी लिहून ठेवलेल्या खिशातील चिठ्ठी वरून लक्षात आली आहे.

सोमवारी सकाळी घरी शाळेवर जात असल्याचे सांगून ते आडस येथील आपल्या शेतात गेले. त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील चिंचेच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उशीराने निदर्शनास आली. आडस येथील सोमनाथ महादेव आकुसकर (वय – ५०) हे धारूर तालुक्यातील रूईधारूर येथे जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते अंबाजोगाई येथे कुटूंबासह राहत होते.

घटनेची माहिती समजताच पोलीस नाईक अनंत आडगळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.