‘या’ कारणामुळे बीडचा निकाल लागणार उशिरा

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून गुरुवारी (दि.२३) रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणी सकाळी आठ पासून सुरू होणार असून पहिला निकाल दहा वाजेपर्यंत लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यातील अटीतटीची लढत झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल उशीरा लागण्याचे संकेत आहेत.

बीड लोकसभा मतदानसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशी लढत होत असली तरी खरी लढत पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यामध्ये आहे. यामुळे या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या मत मोजणीसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. या मतदारसंघामध्ये २ हजार ३२५ मतदान केंद्र आहेत. त्यासाठी १६९ मतमोजणी फेरीसंख्या होणार आहेत. या मतदारसंघातून ३७ उमेदवार असून तीन व्हीव्हीएम मशिन प्रत्येकवेळी तपासणी करावी लागणार असल्याने बीडचा निकाल सर्वात उशिरा लागणार आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांसाठी १४ टेबल आणि एक पोस्टल मतदानासाठीचा टेबल असणार आहे. एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी मत मोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात येणार आहे.