Beed Crime News | सततची नापिकी, सावकाराचे डोक्यावर कर्ज या आर्थिक विवंचनेतून बीडच्या शेतकऱ्याने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – Beed Crime News | राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये जास्त वाढले आहे. शेतात पीक न येणे, डोक्यावर सावकाराचे मोठ्या प्रमाणात कर्ज या आर्थिक परिस्थितीमध्ये शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्यायच शिल्लक नसतो. अशीच एक घटना बीडमधील रांजणी या गावात घडली आहे. यामध्ये एका 42 वर्षीय शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अशोक सुखदेव औंढकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Beed Crime News)

बीड जिल्ह्यातील रांजणी येथील शेतकरी अशोक सुखदेव औंढकर यांचे शेत सततच्या नैसर्गिक संकटांमुळे नापीक झाले होते. खासगी सावकाराचं कर्ज, बँकेकडून घेतलेले उसने पैसे असा दुहेरी कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर होता. यादरम्यान बँक आणि सावकाराने कर्ज फेडण्यासाठी सततचा तगादा लावल्याने अशोक सुखदेव औंढकर हे मोठ्या विवंचनेमध्ये सापडले. यातूनच दुसरा कोणताही मार्ग सापडत नसल्याने अशोक औंढकर यांनी जीवन संपवण्याचा मार्ग घेतला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. औंधकर यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली दोन भाऊ आई-वडील आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. (Beed Crime News)

कुटुंबप्रमुख असणाऱ्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे औंढकर कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. पुढे कुटुंबाचं काय होणार? मुलींचे लग्न मुलाचं लग्न शिक्षण या गोष्टीकडे कोण बघणार?, हे प्रश्न औंधकर कुटुंबासमोर आ वासून उभे राहिले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अशोक औंधकर यांचा मृतदेह शवाविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Beed Crime News | farmer ends his life due to loan debts in beed