न्यायालयाच्या आवारातुन बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचे पलायन

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीने न्यायालयाच्या परिसरातुन पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे. पलायन करणार्‍या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.

अनिल सुनिल पवार (22) असे पलायन करणार्‍या आरोपीचे नाव आहे. सन 2017 मध्ये त्याच्याविरूध्द बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. शिंदे नगर परिसरात बलात्काराचा गुन्हा घडला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती. तेव्हापासुन तो कारागृहात होता. त्याच्या खटल्याची आज (शनिवारी) सुनावणी बीड येथील सेशन कोर्टात असल्याने पोलिस पथकाने त्याला न्यायालयात आणले होते. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक हांगे आणि दोन महिला पोलिस कर्मचार्‍यांनी त्याला न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते. शिक्षा लागण्याच्या भितीने त्याने पलायन केल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र, बलात्कारासारख्या गुन्हयातील आरोपीने पलायन केल्यामुळे पोलिसांनी भंबेरी उडाली आहे. पोलिस त्याचा युध्दपातळीवर शोध घेत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.