धक्कादायक ! बीडमध्ये 13 हजार ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

बीड : पोलिसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात ऊस तोडणीला जाणा-या महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या जात असल्याचा प्रकार सुरु असल्याचे बोलले जात होते. त्या अनुषंगाने केलेल्या सर्वेक्षणात ऊस तोडणीला जाणाऱ्या तब्बल १३ हजार महिलांच्या शस्त्रक्रिया करून त्यांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

सर्वेक्षणात सर्वच ८२ हजार ९०० ऊसतोड महिलांची माहिती संकलित करण्यात आल्याचे समजते. याबाबतचा सर्व अहवाल बीड आरोग्य विभागाने चौकशी समितीकडे पाठविला आहे. काही खासगी रुग्णालयांनी अनेक महिलांना विविध आजारांची भीती दाखवत विनाकारण शस्त्रक्रिया केल्याचेही काही प्रकरणांत उघड झाले आहे.

या समितीने बीडमधील महिलांशी संवाद साधला आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिकांशी बोलून अडचणी व उपाययोजना जाणून घेतल्या होत्या. महिलांनी कोठे शस्त्रक्रिया केल्या ? रुग्णालयाची ठिकाणी ? याबाबतची नेमकी कारणे काय ? याचा अहवाल बनवून तो मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाणार आहे.

जिल्ह्यात सर्वेक्षण केलेल्या ८२ हजार ९०० महिलांची संपूर्ण माहिती ऑनलाइन भरण्यात आली आहे. सरकारी दवाखान्यांपेक्षा खाजगी दवाखान्यात जास्त शस्त्रक्रिया झाल्याचे समजते. यानुसार १० खासगी रुग्णालयांमध्येच जवळपास ६ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –