पंकजा मुंडेंना धक्का ! बीडच्या जिल्हा बँकेसंदर्भात कारवाईचे आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपच्या ताब्यातील जिल्हा बँक संदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांना अध्यक्ष व संचालक पदावरून तात्काळ कमी करण्याचे आदेश लातूर विभागीय सहनिबंधक यांनी दिले आहेत. तसेच जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी बी.एस. देशमुख यांना निलंबित करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

कर्ज माफीमधील प्रोत्साहनाची रक्कम बचत खात्यात जमा करण्याऐवजी कर्ज खात्यात जमा करून अफरातफर केल्याचा ठपका आदित्य सारडा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्ज माफी योजनेमधील प्रोत्साहनपर रक्कमेच्या फेरफारी संदर्भात ठपका ठेवत विभागीय सहनिबंधकाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

बचत खात्याऐवजी कर्ज खात्यात रक्कम वर्ग करणे बँकेला महागात पडले आहे. या संदर्भात शेतकरी नेते कालिदास अपेट यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार सहकार कायदा 1960 मधील कलम 79 व इतर पोट कलमान्वये दोषी आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना कालिदास अपेट यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी स्थानिक निवडणूकांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे. तसेच त्यांनी जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत जवळपास भाजप व मित्र पक्षाचे 29 सदस्य उपस्थित होते, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असले तरी जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहील असे चित्र आहे. मात्र, जिल्हा बँकेवर कारवाई केल्यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/