बीड : करोनाची लागण झाल्याची खोटी माहिती व्हायरल करणार्‍या दोघांविरूध्द FIR

बीड/आष्टी :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्यती खबरदारी घेतली जात आहे. तसेच कोरोना व्हायरसबाबत कोणतीही अफवा पसरवू नये असे आव्हान करण्यात आले आहे. असे असतानाही ‘कोरना ब्रेकिंग अष्टी शहरामध्ये कोरोनाची रुग्ण आढळल्याने खळबळ’ असे तीन व्हॉटसॅप स्टेटस ठेवून तरुणाची बदनामी करून कोरोना बाबात अफवा पसरवणाऱ्या दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऋषीकेश वीर आणि प्रथमेश आवारे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. याप्रकरणी एका तरुणाने रविवारी (दि.15) आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी वीर आणि आवारे याच्याविरोधात अफवा पसरवणे आणि बदनामी करणे असे गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा शनिवारी दुपारी त्याच्या घरी झोपला होता. त्यावेळी ऋषीकेश वीर याने त्याला फोन करून व्हॉटसॅप स्टेटस पाहण्यास सांगितले. तक्रारदार तरुणाने ऋषीकेश वीर याचे व्हॉट्सॅप स्टेटस पाहिले त्यावेळी त्याने तीन स्टोटस ठेवले होते. त्यामध्ये पहिल्या स्टेटसमध्ये आष्टी करोना, पहिला रुग्ण आढळला असे लिहून रुग्णाचे नाव व त्यामध्ये गोल आकाराचा तक्रारदाराचा फोटो ठेवला. दुसऱ्या स्टोटसमध्ये टी.व्ही 9 कोरना ब्रेकिंग आष्टी तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळला आणि तिसऱ्या स्टेटसमध्ये एबीपी माझा कोरोना ब्रेक्रिंग आष्टी शहरामध्ये कोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ असे स्टेटस ठेवले होते.

दरम्यान, हे स्टेटसचे स्क्रिन शॉट काढून आनेकांनी आपल्या स्टेटसमध्ये हे फोटो ठेवले. तसेच तक्रारदार तरुणाला फोन करून तब्बेतीची विचारपूस केली. तक्रारदार याने चौकशी केली असता हे स्टेटस ऋषीकेश आणि प्रथमेश यांनी तयार केले आहे. त्यांच्या या कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच तक्रारदार यांना मानसिक त्रास झाला. तरुणाने आष्टी पोलीस ठाण्यात जाऊन ऋषीकेश वीर आणि प्रथमेश आवारे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

या घटनेची माहिती पोलीस निरिक्षक एम.बी. सुर्यवंशी यांनी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना दिली. तसेच तक्रारदार तरुणाचा जबाब नोंदवून घेऊन अफवा पसरवणाऱ्या वीर आणि आवारे या दोघांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे करीत आहेत.