बीड : पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : (माजलगाव) पोलीसनमा ऑनलाइन – शेतात कापूस वेचत असताना पत्नीचा गळा आवळून खून करून आठ वर्षाच्या मुलालाही पत्नीच्या मृतदेहाजवळ नेऊन त्याचाही गळा आवळून खून करून स्वत : आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मोगरा जवळील रामनगर तांडा येथे आज (बुधवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. या घटनेत आरोपी पती जखमी झाला असून त्याच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन बीड जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

गंगा जाधव (वय- 28), करण बंडु जाधव (वय-8) असे खून झालेल्यांची नावे आहेत. तर बंडू जाधव (वय -32) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव कुटुंबीय आज शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेले होते. दुपारी चारच्या सुमारास बंडू जाधव याने कापूस वेचत असलेल्या पत्नी गंगा हिला मारहाण करून ओढणीने गळा दाबून खून केला. यानंतर झाडाखाली बसलेल्या मुलगा करण आणि मुलगी पुजा (वय-12) यांच्याजवळ गेला. त्याठिकाणी मुलगी पुजाला 100 रुपये देऊन गावी पाठवले तर मुलगा करण याला घेऊन मृत पत्नीच्या ठिकाणी घेऊन गेला. त्याठिकाणी करण याचा ओढणीने गळा आवळून खून केला.

दोघांचा खून केल्यानंतर आरोपी बंडू जाधव याने दोघांच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. वार केल्यानंतर त्याच चाकूने स्वत: ला भोसकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने जवळच असलेल्या विद्युत रोहित्राला चिटकून मरण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरदार शॉक बसल्याने तो दूर फेकला गेला. यावेळी परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती दिंद्रुड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पचंनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. बंडू जाधव याने पत्नी आणि मुलाचा खून कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com