Beed : कलयुग ! 50 हजारांसाठी मुलानं 85 वर्षांच्या वडिलांचा पत्नी अन् मुलाच्या मदतीनं केला खून, विष पाजून तारेनं गळा आवळून मारलं

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – केवळ 50 हजारांसाठी वयोवृध्द बापाचा अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मुलाने आपल्या पत्नीच्या आणि मुलाच्या मदतीने आपल्या 85 वर्षीय बापाला जबरदस्तीनं पकडून विष पाजल आहे. इतकेच नाही तर तारेच्या साह्याने बापाचा गळा आवळला आणि घरात धूर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातून येणारा धूर पाहून गावातील लोकांनी घराकडे धाव घेतल्याने संबधित बापाचा जीव वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काशिनाथ वाल्हू मिसाळ (वय 85 रा. पेठपांगरा, ता. आष्टी ) असे संबधित वयोवृध्द व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अंमळनेर पोलिसांनी आरोपी मुलगा भिवसेन, सून कांताबाई आणि नातू सोमीनाथ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत.

अंमळनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिनाथ मिसाळ हे आपल्या कुटुंबीयासमवेत पेठपांगरा येथे शेतात वास्तव्याला आहेत. 20 एप्रिल रोजी आरोपी मुलाने बापाकडे 50 हजाराची मागणी केली. यावेळी बापाने मुलाला पैसे देण्यास नकार दिला. पैशावरून दोघात वाद झाला. चिडलेला आरोपी मुलाने आपली पत्नी कांताबाई आणि मुलगा सोमीनाथ यांच्या मदतीने बापाला जबरदस्तीने विष पाजंल आहे. त्यानंतर तारेच्या सहाय्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच घरात धूर करून पित्याला कोंडलं. घरातून धूर निघत असल्याचं पाहून गावातील काही लोकांनी घटनास्थळी धाव घेत पीडीत बापाची सुटका केली. पीडीत वृध्दावर शेवगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसांनी शुक्रवारी त्यांचा जबाब घेतला आहे.