Beed News : 6 वर्षाच्या बालकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – हातपाय धुण्यासाठी कालव्यातील रॅमवर गेलेल्या 6 वर्षीय बालकाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. जातेगाव (ता. जि. बीड) येथे शुक्रवारी (दि. 5) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कार्तिक अक्रुर चव्हाण (वय 6) असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. कार्तिकचे वडील अक्रुर चव्हाण हे पुणे येथे कंपनीत कामाला असल्याने दोघे पती- पत्नी हे तिथेच स्थायिक होते. त्यामुळे कार्तिक जातेगाव येथे हा आजीकडे राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक हा शुक्रवारी दुपारी काही मुलांसोबत कालव्याजवळ आला होता. हात पाय धुण्यासाठी तो रॅमवरुन पाण्यात उतरला होता. मात्र, अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यात पडल्याने वाहू लागला. कार्तिक कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती सोबत असलेल्या मुलांनी त्याच्या आजीला घरी जाऊन दिली. कार्तिक पाण्यात वाहून गेल्याने ग्रामस्थांनी त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र रात्र झाल्याने शनिवारी (दि. 6 ) सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा शोध सुरू केला असता घटना घडलेल्या काही अंतरावर कार्तिकचा मृतदेह सापडला. जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले.