बीडमध्ये Lockdown कालावधीत शिथिलता, धनंजय मुंडे यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश

बीड : पोलीसनामा ऑनलाईन –   कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात 26 मार्च ते 4 एप्रिल असा 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात गेल्या वर्षी लागू केलेल्या लॉकडाऊनप्रमाणे पूर्ण बंदचे निर्देश नसले तरी मोठ्या प्रमाणात निर्बंध लागू केले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिथिल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. मात्र, असे करताना त्यांनी नागरिकांना देखील आपली जबाबदारी ओळखून कोरोनाविषयक नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून याची माहिती दिली आहे. निर्बंधांमध्ये मिळालेल्या शिथिलतेमुळे सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये व्यापार आणि उद्योगधंदे करण्याची परवानगी दिली आहे. अनेक व्यापारी संघटनांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आणि जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना सकाळी 7 ते 1 या कालावधीमध्ये निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.