बीड लोकसभा मतदारसंघ : प्रीतम मुंडे VS अमरसिंह पंडित

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्व केलेला बीड लोकसभा मतदारसंघ सध्या त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्या ताब्यात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी बीडचे मैदान मारले. सध्याची स्थिती पाहता हा लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनूनच आगामी निवडणुकीत पुढे येणार आहे. भाजपने विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे याच बीड लोकसभेच्या उमेदवार असणार आहेत असे जाहीर केले आहे. तर प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने अमरसिंह पंडित यांना उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात मंतरलेले राजकारण आहे का असे चित्र मागील चार निवडणुकांपासून पाहण्यास मिळते आहे. कारण राष्ट्रवादी कडून जो उमेदवार दिला जातो तो पुढील लोकसभा निवडणूक संपन्न होण्याआधीच भाजपमध्ये सामील होतो हा या मतदारसंघाचा इतिहास राहिला आहे. यात जयसिंगराव गायकवाड,रमेश आडसकर, सुरेश धस हे तिघे तीन निवडणुका राष्ट्रवादीतून लढले मात्र त्यांनी निवडणुका झाल्यानंतर भाजपात प्रवेश केला आहे. यामुळेच बीडचे राजकारण मंतरल्या सारखे वाटते.

बीड हा स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देण्याऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिनिधित्व केलेला लोकसभा मतदारसंघ आहे. काही काळ साम्यवादी पक्षांना कौल दिलेला हा मतदारसंघ आता हिंदुत्ववादी भाजपचा बालेकिल्ला म्हणून उदयाला आला आहे. मराठा आणि ओबीसींच्या मुष्ठीयुद्धाची लढत या मतदारसंघाने नेहमीच पहिली आहे. आता मुंडे घराण्याचे निर्विवाद वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ या हि खेपेला त्यांच्याच पारड्यात झुकू शकतो. मात्र राष्ट्रवादीची त्यांना चांगलीच लढत मिळणार आहे.