प्रीतम मुंडेंना दिलासा ; उमेदवारीवरील आक्षेप फेटाळले

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड लोकसभा निवडणूकीसाठी ५९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी या उमेदवारांची छाननी होती. छाननी दरम्यान कालिदास आपटे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. यावर आज दुपारी चार वाजता सुनावणी ठेण्यात आली होती. या सुनावणीत प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवरील आक्षेप फेटाळण्यात आले.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर अपक्ष उमेदवार कालिदास आपटे यांनी चार मुद्यावर आक्षेप घेतले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी आपटे यांनी केलेले आक्षेप स्वीकारत यावर चार वाजता सुनावणी ठेवली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंडे यांच्यावर घेण्यात आलेले आक्षेप फेटाळून लावण्यात आले.

अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी दोन लोकसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव नोंदविलेले आहे. एक मुंबई दक्षिण मतदारसंघात आणि दुसरे बीड लोकसभा मतदारसंघात. प्रीतम गोपीनाथराव मुंडे या जाणिवपूर्वक बीड जिल्ह्यातील मतदारांना भावनिक करण्यासाठी स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे नाव स्वत:च्या नावापुढे लावत आहेत. त्यांचे सर्व आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहार प्रीतम गौरव खाडे या नावाने सुरू आहेत. पॅन कार्ड, व्यावसायिक टीन नंबर प्रीतम गौरव खाडे या नावानेच आहे. प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांचा प्रीतम गौरव खाडे या नावाने काढण्यात आलेल्या उद्योग नोंदणीचा वार्षिक हिशोब वेळेवर सादर करण्यात आलेला नाही, असे आक्षेप घेण्यात आले होते. हे सर्व आक्षेप फेटाळण्यात आले.