बीड / माजलगाव : जुन्या भांडणातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण, 5 आरोपींना एक वर्षाची सक्तमजुरी

बीड / माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जुन्या भांडणातून जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी माजलगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस वाघमारे यांनी 5 जणांना एक वर्षाची सक्तमजुरी आणि 2 हजार 600 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. संतोष तुकाराम चव्हाण, रघुनाथ प्रभु जाधव, दत्तात्रय सर्जेराव पवार, बाबासाहेब रामराव चव्हाण, सखाराम उर्फ संजय गणपत चव्हाण (सर्व रा. गोदावरी तांडा, तहत लोणगांव, ता. माजलगाव) असे शिक्षा झालेल्या पाच जणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक सरकारी वकील रणजीत वाघमारे यांनी काम पाहिले.

फिर्य़ादी आणि आरोपी यांची किरकोळ कारणावरून 18 जुलै 2016 मध्ये वाद झाले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांनी जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केले होती. भांडण सोडवण्यासाठी फिर्य़ादी यांचा मुलगा आणि पत्नी आले असता त्यांनाही आरोपींनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा गुन्हा दिंदुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींवर अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करून माजलगाव सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणात एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी चार साक्षीदारांचा महत्त्वाचा पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून अप्पर जिल्हा सत्र न्यायाधीश अरवींद वाघमारे यांनी आरोपींना दोषी ठरवत एक वर्षाची सक्तमजुरी आणि दोन हजार 600 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील रणजीत वाघमारे यांनी काम पाहिले. तर वरिष्ठ अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अजय तांदळे यांनी सहकार्य़ केले. पैरवी अधीकारी म्हणून जालींदर वाव्हळकर यांनी काम पाहिले.

Visit : Policenama.com