तलवारीने सपासप वार करुन धनंजय मुंडे समर्थक माजी नगरसेवकाची निर्घुण हत्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे समर्थक माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड (वय ४६, रा. भीमवाडी, परळी) यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे.

परळी येथील उड्डाणपुलाखाली मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून पूर्ववैमनस्यावरुन ही हत्या घडवून आणली असल्याचा संशय आहे. लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला असताना ही घटना घडल्याने त्याला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका आहेत. गायकवाड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गौतमनगर भागात पांडुरंग गायकवाड यांचे काम अधिक होते. येथील उड्डाण पुलाखालील लोकांना टँकरने पाणीपुरवठा चालू होता. मध्यरात्री साडेबारा वाजता टँकर आला होता. त्यामुळे पांडुरंग गायकवाड हे त्या ठिकाणी आले. त्यावेळी काही जणांनी पूर्व वैमनस्यावरुन त्यांच्यावर तलवारीने सपासप वार करुन त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना समजताच पोलीस अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अंबाजोगाई चे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली असून याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. मात्र, गायकवाड यांची हत्या कोणत्या कारणावरुन झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.