गोपीनाथ गडावरून धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना भावनिक साद, म्हणाले…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची आज जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) हे गोपीनाथ गडावर दर्शनासाठी आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी बहिण पंकजा मुंडे (Pankaja munde) यांना भावनिक साद घातली. ते म्हणाले, घरामध्ये जरी राजकीय वैर असलं तर घरात संवाद असावा ही माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे. तसं होत असेल तर आमची काही अडचण नसल्याचे मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, लोकांच्या प्रश्नासाठी लढा उभा करणं दिवंगत मुंडे साहेबांकडून शिकायला मिळालं, तर प्रश्न सोडवणं पवार साहेबांकडून शिकलो. माझ्या सारखा नशिबवान मीच, अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या. गोपीनाथ गडावर जयंतीनिमित्त दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी मुंडे कुटुंबाच्या नात्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, आज साहेबांची जयंती म्हटलं की मनाला वेदना होतात. आप्पांचा वाढदिवस मी परळीत मोठ्या थाटा माटात साजरा करायचो. आण्णांच्या जाण्यानंतर मुंडे कुटुंबात या पीढीतला मी सर्वात मोठा आहे. घरामध्ये राजकीय वैर असलं तर घरात संवाद असावा ही माझी पहिल्यापासूनची इच्छा आहे. तसं होत असेल तर आमची काहीच अडचण नाही. शेवटी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि घर घराच्या ठिकाणी असावं, असं मानणारा मी आहे.

यापूर्वीही दिला होता पंकजांना आधार

काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे या आजारी होत्या. यावेळी धनंजय मुंडे यांनी भावाच्या नात्याने त्यांना सल्ला देत आधार दिला होता. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे, अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी दिली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी कोरोना विषाणूच्या त्रासाबाबत माहिती देत पंकजा यांना आवाहन केलं होतं की, पंकजाताई मी स्वत: कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे. तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये, कोरोनाविषयक सर्व चाचण्या करुन घे. स्वत:ची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे.