Beed : कोवीड सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा, डॉक्टरसह 6 आरोग्य कर्मचार्‍यांना घरचा रस्ता

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यातील विविध भागात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. मात्र कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर योग्य उपचार केले जात नसल्याची आणि रुग्णांना योग्य वागणूक दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बीड जिल्ह्यातील आष्टी येथील कोविड केअर सेंटरमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडल्या असून यासंदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.

रुग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीनंतर शनिवारी पहाटे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी आष्टी कोविड केअर सेंटरमध्ये अचानक भेट दिली. यावेळी अस्वच्छता, उपचारांतही हलगर्जी होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ डॉक्टरसह सहा आरोग्य कर्मचाऱ्यांची हाकालपट्टी केली. डॉ. आर.बी पवार यांनी कोविड केअर सेंटरमधील डॉ. माधुरी पाचरणे यांच्यासह अश्विनी पांतावणे, रुपाली काळे या परिचारिका आणि चार वॉर्डबायची तात्काळ हकालपट्टी केली.

जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यूची संख्या रोखण्यात प्रशासन आणि आरोग्य विभागाला अपयश आले आहे. ज्या कोरोना बाधितांना लक्षणे नाहीत किंवा कमी आहेत, अशांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयची नियुक्ती केली आहे. मात्र, आष्टी कोविड केअर सेंटरमध्ये सर्वत्र अस्वच्छता आणि रुग्ण बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तसेच डॉक्टरांकडून रुग्णावर योग्य उपचार केले जात नसून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी भल्या पहाटेच कोविड सेंटर गाठले. त्याठिकाणी रुग्णांवरील उपचारामध्ये हलगर्जीपणा होत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी डॉक्टरसह 6 आरोग्य कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली. तसेच याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश संबंधितांना दिले. या कारवाईने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या कारवाईनंतर बिड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी सांगितले की, कोरोना महामारीत कोणी हलगर्जी करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. चांगले काम केल्यास पाठीवर थाप असेल अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पवार यांनी सांगितले.