शेतकऱ्यांच्या प्रश्नी आ. संदीप क्षीरसागर आक्रमक, आता गाव पातळीवरच तलाठी, कृषी सहायक पीक विम्याचे अर्ज स्वीकारणार !

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात जायची गरज नाही, अर्ज जमा करण्याचे आ. क्षीरसागर यांचे आवाहन

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – यावर्षी दुष्काळाची छाया कायम असतांना कशा-बशा पावसावर केलेल्या पेरण्या आणि आज उभी असलेली पिके परतीच्या पावसाने उध्वस्त झाली आहेत. शेतातील कापसाच्या वाती झाल्या असून बाजरीला कोंब फुटले आहेत तुर, सोयाबीनसह आदी पिकांचे नुकसान झाले असल्याने तातडीने पंचनामे करुन मदत करण्यात यावी, अशा सुचना आमदार संदिप क्षीरसागर यांनी दिल्या होत्या, त्यावर जिल्हा कृषी अधिकारी यांनी पिमा भरलेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात अर्ज जमा करण्याचे सांगितले होते.

यावर आ. संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक होत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बीड तालुका कृषी कार्यालयात येण्यापेक्षा गाव पातळीवरच अर्ज घ्या अशी भूमिका घेतल्याने बीडचे तहसीलदार श्री आंबेकर यांनी सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांची बैठक बोलवत गाव पातळीवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता गाव पातळीवरच तलाठी, कृषी सहायक पीक विम्याचे अर्ज स्वीकारणार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कृषी कार्यालयात जायची गरज नाही, नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी गाव पातळीवर अर्ज द्यावेत असे आवाहन आ संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड व शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील उभी असलेली पिके अक्षरशः उदध्वस्त झाली आहेत. उंची खुंटलेल्या कापसाला दहा-पाच बोंडे आले होते. ते फुलून गेले असतांना पडलेल्या पावसाने कापसाच्या वाती झाल्या आणि त्यातील सरकीला कोंब फुटले आहेत. बाजरीचीही तशीच परिस्थिती आहे. इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. दसरा दिवाळीचा आनंदाचा सण शेतकर्‍यांसमोर असतांना परतीच्या पावसाने पाणी-पातळीत वाढ झाली असली तरी शेतकर्‍यांच्या पिकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या नुकसानामुळे शेतकरी एक वर्षभर पाठीमागे गेला असून प्रशासनाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन मदत द्यावी, अशा सुचना आ. संदिप क्षीरसागर यांनी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांच्या मार्फत बीड व शिरुर तहसिलदार यांना दिल्या होत्या, जिल्हा कृषी अधिकारी बीड यांनी पत्र काढून पिमा भरलेल्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज तालुका कृषी कार्यालयात जमा करण्याचे सांगितले होते. त्यावर आता आ. संदीप क्षीरसागर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे गाव पातळीवर तलाठी, कृषी सहायक अर्ज स्वीकारणार आहेत तरी गाव पातळीवरील सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन अर्ज भरण्यासाठी मदत करावी असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.