श्रीराम प्रभूंनी सामूहिक विवाह सोहळ्याचा आदर्श जगाला दिला : रामायणाचार्य प्रा.नाना महाराज कदम

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – लग्न सोहळ्यातील खर्चाला फाटा देत गावांतील सप्ताहाच्या मंडपातच लग्न करुन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेवराई तालुक्यातील खेर्डा येथील पांडुरंगा आश्रम येथे आयोजित भव्य रामकथा व अखंड हरिनाम सप्ताहात दि. 31 जानेवारी रोजी श्रीराम कथेत प्रभूरामचंद्राच्या विवाह सोहळ्याच्या कथेत गावांतील हरिनंद महाराज धुर्वे यांच्या स्वाती धुर्वे या मुलीचा परंडा तालुक्यातील शिराळा येथील सुरेश गोरख सुरवसे या मुला सोबत अचानक पण भव्य थाटात लग्न सोहळा पार पडला.

beed
प्रा.नाना महाराज कदम यांनी यावेळी उपस्थितीना कथेतून मार्गदर्शन करतांना श्रीराम प्रभूंनी सामूहिक विवाह सोहळ्याचा आदर्श जगाला दिला. त्यामुळे लग्न सोहळ्यावरील अतिरिक्त खर्च टाळून सामूहिक विवाह सोहळे करावे असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर श्री. ह भ प महंत भगीरथ (बापु)महाराज, श्री. ह भ प वासुदेवा नंद सरस्वती महाराज, गोविंद महाराज नाईकवाडे, मोहनी बाबा महाराज, तुकाराम महाराज कराडकर, अभिमान महाराज ढाकणे, योगेश महाराज जोगदंड यांच्यासह हजारो भाविक भक्त उपस्थित होते.

गेवराई तालुक्यातील खेर्डा येथे पांडुरंगा आश्रम येथे भव्य संगीत तुलशी श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताहात श्री ह भ प प्रा नाना महाराज कदम यांची सुश्राव्य कथा सुरु आहे. आज श्री राम प्रभूच्या विवाहाची कथा सांगताना महाराज म्हणाले की वाईट काम करणाऱ्या मित्रा सोबत जावू नका. मोठा माणूस असला तरी त्याने संगती संभाळली पाहिजे. देव भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी अवतरतो. प्रत्येकाने गाईची सेवा केली पाहिजे. तसेच संत संगती प्रयत्नांने करावी कुसंगती टाळली पाहिजे, विसंगती भोगून संपवावी लागते. जीवनाचा आनंद घ्या. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा असे सांगितले. तसेच सामूहिक सप्ताह आणि उत्सवात लग्नसोहळे करणे हे गरजू लोकांना फायदेशीर आहे, असे सांगताना वारकरी संप्रदायाचे विचार या नवदांपत्यांने घेवून आनंदाने जीवन जगावे अशा शुभेच्छा दिल्या.