कोयत्याला मिळेल न्याय ! पंकजा मुंडेंचं भावनिक ट्विट, CM उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार

पोलिसनामा ऑनलाईन – माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगार प्रश्नावर भावनिक साद घातली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले आहे. मुंडे यांनी ट्वीट करून सर्व ऊसतोड कामगार आणि मजुरांना धीर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

’कोयत्याला न्याय मिळेल. ऊसतोड कामगारांनी विश्वास ठेवावा. खासदार शरद पवार, जयंत पाटील, दांडेगावकर चेअरमन साखर कारखाना संघ यांच्याशी चर्चा करणार आहे’ असे मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्यांनी एकापाठोपाठ 3 ट्वीट केले आहे. ’आपण सर्वांनी विश्वास ठेवावा, कोयत्याला सन्मान नक्कीच मिळेल तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे’ असे आवाहनही पंकजांनी कामगारांना केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे सक्रीय राजकारणापासून काही काळ बाजूला गेल्या आहे. आता कोरोनाच्या काळात ऊसतोड कामगारांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी आता आंदोलनाचे संकेत दिले आहे.