बीड : शेतात झोपलेल्या बाप-लेकाच्या अंगावर गेला JCB, डोळ्यादेखत वडिलांचा गेला जीव

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात झोपलेल्या बाप-लेकांच्या अंगावरून जेसीबी गेल्याने वडीलांचा मुलाच्या डोळ्यासमोर जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.7) घडला असून यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला. गेवराई तालुक्यातील मारफळा तांडे येथील शेतात पाईपलाईनचे काम सुरु असताना ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर डोळ्यादेखत आपल्या वडिलांना गमवल्यामुळे मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलगा शेजारी-शेजारी शेतात झोपले होते. पण शेतात रात्रीच्या वेळेला कामाला सुरुवात झाली आणि अंधार असल्याने जेसीबी चालकाना बाप-लेक झोपल्याचे दिसले नाही आणि जेसीबी त्यांच्या अंगावर गेला. यात जोरात चिरडलं गेल्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला असून ही घटना काल मध्यरात्री घडली.

मारफळा तांडा येथील अंकुश राठोड यांच्या शेतात रात्रीच्या वेळी जेसीबीच्या सहाय्याने पाईपलाईन खोदण्याचे काम सुरु होते. साहेबराव रुपा राठोड व त्यांचा मुलगा मनोज राठोड हे बाजूला जाऊन झोपले होते. मात्र, काम चालू असताना चालकाच्या लक्षात न आल्याने ते दोघेही जेसीबीच्या खाली आले. यामध्ये साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला तर मनोज हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचानामा करून साहेबराव राठोड यांचा मृतदेह नजिकच्या स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तर जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालया पाठवून दिले. रुग्णालयात मुलावर उपचार सुरु आहेत. हा सगळा प्रकार नेमका कसा घडला याचा पोलीस तपास करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.