बीडमध्ये भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर, पंकजा मुंडेना धक्का ?

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जळगाव महापालिकेत भाजपाच्या सत्तेला सुरूंग लावण्यात शिवसेनेला यश आले आहे. त्यापाठोपाठ आता बीडमधील भाजपच्या माजी आमदाराने थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. माजी आमदार तथा पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी गुरुवारी (दि. 18) जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. विशेष म्हणजे या बैठकीमध्ये त्यांनी 3 मिनिटाचे भाषण सुद्धा ठोकले. तसेच आंधळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का समजला जात आहे.

यावेळी सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री, आमदार प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडीत, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे आदी उपस्थित होते. माजी आमदार आंधळे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील होते. तसेच ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपचा ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. आता होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील पीछेहाट होत असल्याने भाजपची व बीडमधील पंकजा मुंडे यांची ताकत कमी तर होत नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.