Beed News : शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या !

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीडच्या अंबाजोगाईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मनोजकुमार प्रभाकर पोटभरे (वय 35) असं या शिक्षकाचं नाव आहे.

धारूर येथील जिल्हा परिषद शाळेवर मनोज पोटभरे कर्तव्य बजावत होते. त्यांनी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. त्यांनी एक सुसाईड नोटही लिहिली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशी माहिती आहे की, कौटुंबिक कलहातून या शिक्षकानं हे पाऊल उचललं आहे. या घटनेमुळं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, बहिण, पत्नी, दोन मुलं असं कुटुंब आहे.

धारूर तालुक्यातील पिंपळवाडा जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले मनोजकुमार पोटभरे हे विद्यार्थीप्रिय शक्षक म्हणून ओळखले जात होते. इंग्रजी विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयात रस निर्माण करणं यात त्यांचा हातखंडा होता.

अतिशय शांत, संयमी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची धारूर तालुक्यात ओळख होती. परंतु त्यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर आता हळहळ व्यक्ती केली जात आहे.