पोलिस कर्मचार्‍याच्या आत्महत्येचं गुढ उकललं, तरूणीच्या ब्लॅकमेलिंगमुळं केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – तरूणीकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी या पोलिसाने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरूणीसह एका पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव दिलीप प्रकाश केंद्रे असून ते बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बीड शहरातील धांडेनगर परिसरामध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली आहे.

पोलिसांनी सांगितले की, जळगाव येथील तरूणीने केलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून दिलीप प्रकाश केंद्रे यांनी आत्महत्या केली आहे. केंद्रे हे सुद्धा यापूर्वी जळगाव येथे कार्यरत होते. ते मागील सहा महिन्यांपासून अस्वस्थ होते. केंद्रे यांच्या पत्नीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्या तरुणीसह जळगाव येथील एका पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोणत्या कारणावरून ब्लॅकमेल केले जात होते, हे अद्याप समजलेले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/