धक्कादायक….बीड जिल्ह्यात बारा तासांत तीन आत्महत्या

बीडः पोलीसनामा आॅनलाईन
जिल्ह्यात 12 तासांत आत्महत्येच्या तीन घटना समोर आल्या आहेत. केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथे एका युवतीने राहत्या घरात फॅनला अोढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. तर बॅंकेचे कर्ज वेळेत भरता येईना तसेच खासगी सावकाराचा तगादा या कारणावरुन आष्टी जवळील शिंदेवस्तीवरील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच दारुच्या नशेत बाभळीच्या झाडाल गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना कऱ्हेवाडी (ता. आष्टी) गावात घडली.

केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील शिवानी महादेव काळे (१७) या बारावीच्या विद्यार्थिनीने बारावीची परीक्षा दिली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शिवानीचे आई-वडील रविवारी रात्री जेवण झाल्यानंतर दारात तर शिवानी घरात झोपली होती. सोमवारी पहाटे झोपेतून उठल्यानंतर कुटुंबाने घर उघडून पाहिल्यांनतर तिने ओढणीने फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. मात्र आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. बाळासाहेब संभाजी तपसे यांच्या माहितीवरून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर दुसरी घटना आष्टी शहरापासून जवळच असलेल्या शिंदे वस्ती येथे घडली. संजय मोहन शिंदे (३२) या शेतकरी तरुणाने सोमवारी पहाटे शेतातील उंबराच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी सहाच्या दरम्यान वस्तीवरील एक मुलगा शौचास गेला तेव्हा त्याला हा प्रकार दिसून आला. पोलिसांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाला भेट दिली.

दारूच्या नशेत एकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी येथे रविवारी रात्री घडली. कऱ्हेवाडी येथील गंगाराम तात्याबा सांगळे ( ४५) यांनी नशेत ६ मे रोजी घराच्या पाठीमागील बाबळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.