शेतकर्‍यांमध्ये संताप ! ‘महाबीज’कडून सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत वाढ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : राज्यात कोरोनाचा कहर सुरु असताना आता पेरणीच्या ऐन तोंडावरच सरकारच्या अधीन असणार्‍या महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. सोयाबीनचे बियाण्यांच्या किमतींमध्ये महाबीजने 30 किलोच्या बॅगमागे तब्बल 360 रुपयांनी वाढ केली आहे. क्विंटल मागे एक हजार रुपयांपेक्षा जास्त वाढ केल्याने शेतकार्‍यातून संताप व्यक्त केला जात आहे.
दरवर्षी राज्यामध्ये जवळपास 40 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेतले जाते. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकर्‍यांना सोयाबीन शेतीचा मोठा आधार आहे. एकीकडे मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून लॉकडाऊन असल्या कारणाने आधीच शेतकर्‍यांचा हंगाम वाया गेला आहे.

असे असताना आता पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांची दरवाढ शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीत आणणारी आहे. महाबीज हे महामंडळ सरकारच्या आधीन राहून काम करते. मागच्या वर्षीच्या खरीपामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा मोठा परिणाम सोयाबीनच्या प्रतवारीवर झाला आहे. बियाण्यांसाठी वापर केले जाणारे सोयाबीन हे चांगल्या प्रतीचे असते आणि या सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे ही वाढ करावी लागत असल्याचे महाबीजकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी शेतकर्‍यांना महाबीजकडून बियाण्यासाठी दिले जाणार्‍या सोयाबीन हे 62 रुपये प्रति किलोने दिले जात होते. यावेळेस यामध्ये बारा रुपये किलोला भाव वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच 30 किलो बॅगमागे तब्बल 360 रुपयांची भाववाढ झाली आहे. तर क्विंटल मागे एक हजार रुपये पेक्षाही जास्तीची भाव वाढ केल्याने शेतकर्‍यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.