बीडमध्ये उद्या काय होणार ? जि.प. मध्ये पंकजा मुंडे Vs धनंजय मुंडे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड जिल्हा परिषद भाजपच्या म्हणजेच पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे. उद्या जिल्हा परिषद उपाध्यक्षांची निवडणूक होणार आहे. पंकजा मुंडे यांना शह देऊन जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी धनंजय मुंडे यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी ते मुंबईहून औरंगाबादमध्ये पोहचले आहेत. औरंगाबादमध्ये जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एक बैठक घेऊन उद्याच्या

निवडणुकीसंदर्भातील रणनीती ठरवली जाणार आहे.
जिल्हा परिषदेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी 27 सदस्यांचा आकडा जुळवणे गरजेचे आहे. भाजपने आपल्या 25 सदस्यांना सहलीवर नेले आहे. भाजपला शिवसेनेच्या मदतीशिवाय हा आकडा जुळणे कठीण आहे. 53 सदस्यांमधून अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड करावयाची आहे. 27 सदस्य असलेल्या पक्षालाच सत्ता स्थापन करता येणार आहे.

बीड जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात असून राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्या 23 आहे. मात्र, राष्ट्रवादी सोबत शिवसेना आल्यास चार सदस्य वाढतील. विशेष म्हणजे भाजपमधील काही सदस्य राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याने बीड जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी धनंजय मुंडे हे शर्तीचे प्रयत्न करत असताना पहायला मिळत आहेत.

उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपसोबत राहणार का ? हा प्रश्न आहे. कारण राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढताना दिसत आहे. त्यामुळे बीड जिल्हा परिषद पंकजा मुंडे पुन्हा आपल्या ताब्यात घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. बंडाची मोठी किनार असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बंडाचे राजकारण पहायला मिळणार का हे महत्त्वाचे ठरणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/