इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या या फोटोने उठला विवाद

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आणि या फोटोमुळे आता विवाद सुरु झाला आहे. तसेच भाजपच्या राज्यात हे कसे चालू शकते, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. भाजपचे माजी खासदार बलवीर पुंज यांनी या फोटोवर तिखट शब्दात टिका केली आहे.

रामचंद्र गुहा यांनी पोस्ट केलेल्या फोटोत ते काही खात असल्याचे दिसून येते. त्यावर त्यांनी लिहिले आहे की, जुन्या गोव्यातील सुंदर सकाळ नंतर पणजीत लंच केले. गोव्यात भाजपचे शासन आहे़ तेव्हा मी निर्णय घेतला की, आज जेवणामध्ये बीफ खाऊ. फोटोबरोबरच त्यांनी गोव्यातील सुंदर फोटोही पोस्ट केले आहेत.

या फोटोवर भाजपचे माजी खासदार बलवीर पुंज यांनी टिका करताना म्हटले आहे की, आपण बीफ खाऊन आणि सोशल मिडियावर फोटो पोस्ट करुन जेवणाचा आनंद घेत नाही तर जाणून बुजून लाखो लोकांच्या विश्वासाची खिल्ली उडवत आहात. आपल्या सेक्युलर मानसिकतेमुळे आपल्याला कसे संवेदनहीन माणूसमध्ये परिवर्तित केले आहे.

गुहा यांच्या या फोटावर अनेकांनी टिका केली. काहींनी तर त्यांना मारहाण करु अशी धमकीही दिली. तर काहींनी त्यांची संभावना राक्षस अशी केली.

भाजप वैचारिक पातळीवर बीफला विरोध करत असून अनेक भाजप शासित राज्यात बीफला बंदी आहे. मात्र, गोव्यात भाजप शासन असूनही येथे बीफला बंदी नाही. कारण गोव्यात संपूर्ण जगभरातून पर्यटक येतात आणि त्यांना खाण्या पिण्यावर बंधने आणली तर त्यातून पर्यटन व्यवसायावर परिणाम होईल यासाठी गोवा शासनाने ही बंदी आणलेली नाही.

रामचंद्र गुहा यांनी केंद्र सरकारच्या अनेक धोरणांवर टिका केली आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वीही भाजप समर्थकांचा विरोध सहन करावा लागला होता.