राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ 200 जणांवर मधमाशांचा हल्‍ला : 3 महिलांसह 7 जण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उन्हाळी शिबिरासाठी राजगड किल्ल्याच्या पायथ्याजवळ गेलेल्या तब्बल 200 जणांवर मधमाशांनी हल्‍ला केल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 150 हून अधिक शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असुन हल्ल्यात 3 महिलांसह 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी भडक रंगाचे नवीन टी-शर्ट घातल्याने टी-शर्टच्या वासामुळे आकर्षित होवुन मधमाशांनी हल्‍ला चढविल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्‍त केला आहे.

गुंजवणे हे गाव राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. प्राध्यापक गजानन व्हावळ यांनी गुंजवणे गावात चार दिवसीय उन्हाळी शिबीर आयोजित केले होते. शिबिराचा आज पहिला दिवस होता. सर्वजण गुंजवणी येथे एकत्र जमले होते. शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड असे नाव छापलेले नवीन भडक रंगाचे टी-शर्ट घालुन विद्यार्थी तेथे जमले असतानाच नवी टी-शर्टच्या वासामुळे झुडुपांमध्ये असलेल्या मधमाशांनी आकर्षित होवुन त्यांच्यावा हल्‍ला चढविला. मधमाशांनी हल्‍ला केल्यानंतर विद्यार्थ्यांना कोठे जावे हे सुचत नव्हते. ग्रामस्थांनी त्यांना घरात घेवुन त्यांची मधमाशांपासून सुटका केली.

दरम्यान, शिक्षिका ज्योती कड यांनी विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी अथक प्रयत्न केले. दरम्यान, या हल्ल्यात शिक्षिका ज्योती कड, अनुष्का रूगे, स्वाती पाटील, ओंकार शेलार, श्रेयस क्षीरसागर, अशोक चव्हाण आणि प्रविण वराडे हे गंभीर जखमी झाले आहेत. शालेय विद्यार्थ्यांवर मधमाशांकडून हल्‍ला झाल्यानंतर गुंजवणे गावापासुन 3 किलोमीटर अंतरावरील गावात त्यांना उपचारासाठी नेण्यात आले. पोलिस आणि तहसिलदारांनी यासाठी मदत केली. या हल्ल्यामध्ये 3 महिलांसह 7 जण गंभीर जखमी आहेत तर इतरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी दिली आहे.