भरदिवसा आळंदीत माऊली मंदिरासमोर सराईत गुन्हेगारावर सपासप वार

आळंदी : पोलीसनामा ऑनलाईन – आळंदी येथील माऊली मंदिरासमोर एका सराईत गुन्हेगारावर दोन ते तीन जणांनी कोयत्याने वार केल्याची घटना आज (रविवार) दुपारी चारच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. लंकेश ठाकूर असे गंभीर जखमी झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लंकेश ठाकूर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पूर्वी झालेल्या वादातूनच त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. लंकेश याच्यावर दोन ते तीन जणांनी कोयत्याने सपासप वार केले.

लंकेशच्या मानेवर आणि छातीवर वार करण्यात आले आहेत. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.