सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांचे रॅकेट ? काळेवाडीत एकाच महिलेकडे सापडली 11 मुले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – काळेवाडी येथील सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या एका महिलेकडे अकरा लहान मुले सापडली आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरात सिग्नलवर भिक्षा मागणाऱ्या मुलांचे रॅकेट आसण्याचा संशय नगरसेवकांनी घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील तापकीर चौक सिग्नलजवळ वेगवेगळ्या वयोगटातील अकरा लहान मुले भिक्षा मागत होती. नगरसेवक अभिषेक बारणे यांना याबाबत संशय आली. त्यांनी आजूबाजूला चौकशी केली. चौकशी करत असताना असे समजले की, एका भिक्षा मागणाऱ्या महिलेने ही सर्व मुले तिची व तिच्या मोठ्या बहिणीची आहेत. दोघींचे पती त्यांचा सांभाळ करीत नाहीत.

मात्र, बारणे यांना प्रथमदर्शनी मानवी तस्करीचा प्रकार असल्याचे वाटत असल्याने त्यांनी मुलांना घेऊन थेट वाकड पोलीस ठाणे गाठले. वाकड पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मुले देखील पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नावर एकसारखी उत्तरे देत होती. त्यामुळे मुलांना प्रशिक्षण दिले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मोठ्या शहरामध्ये भिक्षा मागणाऱ्याचे रॅकेट असलेले प्रकार अनेकदा समोर आले आहेत. लहान मुलांची तस्करी करुन त्यांच्या शरीराला इजा करुन रस्त्यावर भिक्षा मागायला उभा केले जाते. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/