‘त्या’ भिकारी महिलेने शहीद जवानांना दिली आयुष्यभराची कमाई

अजमेर : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले. यानंतर अनेकजण शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचे हात देत आहेत. अशातच गर्व वाटावी अशी घटना समोर आली आहे. एका भिकारी महिलेने आपल्या आयुष्यभराची कमाई शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिले आहेत. सदर महिला ही राजस्थानमधील असून तिने तब्बल 6 लाख रुपये मदत म्हणून दिले आहेत. तिच्या या दानशूरतेतून अनोख्या देशभक्तीचे दर्शन घडते.

सदर महिला ही राजस्थानातील अजमेरमधील एका मंदिराबाहेर भीक मागते. तिने दाखवलेली ही देशभक्ती सर्वत्र कौतुकाचा विषय ठरताना दिसत आहे. तिने आयुष्यभर भीक मागून ही रक्कम जमा केली होती. आता ही रक्कम तिने हुतात्मा जवानांच्या कुटुंबांना दिली आहे.  देवकी शर्मा असे या भीक मागणाऱ्या महिलेचे नाव असून, देवकी शर्मा सध्या या जगात नाहीत. सहा महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. मात्र त्यांच्याच इच्छेनुसार त्यांनी जमा केलेली रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना दिली आहे.

देवकी शर्मा यांची इच्छा होती की, त्यांच्याजवळील रक्कम ही चांगल्या कामासाठी वापरली जावी. याबाबत तिने अंबे माता मंदिराच्या विश्वस्तांना सांगितले होते. संदीप असं मंदिराच्या विश्वस्तांचं नाव आहे. संदीप यांनी देवकी शर्मा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्यांनी जमवलेली रक्कम अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्याकडे बँक ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली. महिलेने भीक मागून जमवलेली संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली.

या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार ती रक्कम पुलवामा हल्ल्यातील जवानांच्या कुटुंबांना देण्यात येणार आहे. देवकी शर्मा भीक मागून जमवलेले पैसे घरात ठेवत होत्या. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंथरुणाखाली आणखी दीड लाख रुपये मिळाले होते. हा पैसाही मंदिर समितीने बँकेत जमा केला होता असे समजत आहे.