राज्यात धुवांधार बॅटींग करणारा मान्सूनची ‘एक्झिट’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात गेल्या चार महिन्यापेक्षा अधिक दिवस धुवांधार बॅटींग करणा-या मॉन्सूनने आता एक्झिट (monsoon-exit-state) घेण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण विदर्भासह, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणच्या काही भागातून मॉन्सून माघारी परतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. दक्षिण पश्चिम मॉन्सून नांदेड, नाशिक, डहाणुपर्यंत माघारी परतला. संपूर्ण देशातून मॉन्सून 28 ऑक्टोबरपर्यंत माघारी परतण्याची शक्यता आहे.

नैऋत्य मॉन्सूनने पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंडचा बहुतेक भाग, ओडिशा, छत्तीसगडचा उर्वरित भाग, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा काही भाग, तेलंगणा, संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राचा उत्तरेकडील भागातून परतला आहे़ त्याचबरोबर तामिळनाडू आणि पुडुचेरी, आंध्र प्रदेशचा किनारी भाग, कर्नाटक आणि केरळच्या आसपास 28 ऑक्टोबरपासून ईशान्य मॉन्सूनचा पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे.

गेल्या 24 तासात कोकणातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पाटण, पौड मुळशीसह अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. 27 ऑक्टोबर) रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरपासून गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़

मॉन्सूनचा मुक्काम लांबला..
गेल्या काही वर्षांपासून मॉन्सूनचे आगमन व परतीच्या प्रवासात मोठा बदल आढळून येत आहे. त्यामुळे या वर्षी हवामान विभागाने देशभरातील विविध शहरात मॉन्सूनचे आगमन कधी होणार व तो कधी परतणार याच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. विदर्भातून 3 ऑक्टोबर, मराठवाडा 28 सप्टेबर रोजी परतेल यापर्वी अशा तारखा जाहीर केल्या होत्या. त्यात यंदा 8 व 9 ऑक्टोबर अशा सुधारित तारखा जाहीर केल्या होत्या. प्रत्यक्षात मॉन्सूनने एक्झिट घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मॉन्सूनच्या माघारीची सरासरी तारीखा खालीलप्रमाणे :
ठिकाण जुनी तारीख सुधारीत तारीख प्रत्यक्षात माघारी
अकोला – 3 ऑक्टोबर 8 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर
औरंगाबाद 28 सप्टेबर 9 ऑक्टोबर 26 ऑक्टोबर
अहमदनगर 28 सप्टेबर 8 ऑक्टोबर अजून मुक्काम
पुणे 30 सप्टेबर 9 ऑक्टोबर अजून मुक्काम
सातारा 3 ऑक्टोबर 12 ऑक्टोबर अजून मुक्काम
गोवा 30 सप्टेबर 14 ऑक्टोबर अजून मुक्काम