श्रीनिवास पाटील यांची धनंजय मुंडेंना कोपरखळी, म्हणाले – ‘महान पुरूषामागे एक स्त्री असते, पण ती पत्नीच असते असं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही, अशा शब्दात खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता कोपरखळी मारली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्काराचा (rape) आरोप झाल्याने धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या महिलेने ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या महिलेनं तक्रार दाखल केली. मात्र कोणाचाही जबाब नोंदवण्यात आला नाही. परंतु आता या प्रकरणात जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. आता मुंबई पोलीस धनंजय मुंडे आणि आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदवणार आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की, एखादी महिला तिच्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात तक्रार दाखल करत असेल, तर त्याबाबत तक्रार दाखल करुन तात्काळ चौकशी सुरु करावी.