आयटीमधील जॉब असल्याने काम करण्यात समाधान वाटते – दमयंती पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आयटी क्षेत्रामध्ये काम करत असताना वेळेचे बंधन नसते. दिवस-रात्र कार्यतत्पर राहावे लागते. आयटी क्षेत्रामध्ये नाव आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, कुटुंब सांभाळत कार्यालयीन कामकाज सांभाळताना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागतो, हे विसरून चालणार नाही. आयटीमध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञानाशी सामना करावा लागतो, चॅलेंजिंग जॉब असल्याने काम करण्यात समाधान वाटतो, असे सीमन कंपनीच्या व्यवस्थापिका दमयंती पाटील यांनी सांगितले.

मंडई विद्यापीठ कट्टाच्या वतीने महिला दिनानिमित्त सीमन कंपनीच्या व्यवस्थापिका दमयंती पाटील, पुणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापिका शुभांगी धाडवे, राधिका मालुसरे-चव्हाण, पुणे महानगरपालिकेच्या महिला आरोग्य निरीक्षिका सोन्या अबोणकर, सुषमा पुंडे, अर्चना कानडे, लतिका तमनर, अश्विनी भागवत, शिवसेना शिव अंगणवाडीच्या जिल्हाध्यक्षा अमृत पठारे यांना भेटवस्ती, साडी-चोळी आणि भगवे फेटे बांधून सन्मान करण्यात आला.

आरोग्य निरीक्षिका सुषमा पुंडे म्हणाल्या की, येरवडा परिसरामध्ये झोपडपट्टी मोठी आहे. त्यामुळे त्यांचे प्रबोधन करताना मोठी कसरतच करावी लागते. अनेक वेळा तेथील नागरिक भांडणाच्या तयारीत असतात. त्यामुळे त्यांची समजूत काढून काम करावे लागते. कोरोनाच्या कालावधीमध्ये काम करताना तेथे आम्हाला मोठी कसरत करावी लागली, असा अनुभव त्यांनी सांगितला.

पुणे अर्बन बँकेच्या अधिकारी राधिका मालुसरे-चव्हाण यांनी सांगितले आज महिला चूल आणि मुल एवढ्यापुरती मर्यादित राहिली नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आघाडीवर आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योग व्यवसायामध्येही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे म्हणाले की, समाजामध्ये काम करीत असताना काय मिळत आहे, यापेक्षा मी समाजाला काय देतो यामध्ये समाधान बाळगण्याची गरज आहे. मागिल वर्षभरापासून कोरोनामुळे सामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागली आहे. उद्योग, व्यवसाय, कंपन्या अद्याप सुरळीत झाल्या नाहीत, त्यामुळे अनेकांना रोजगार नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येऊ पाहत आहे, तर पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.