चेन्नई जवळील 697 टन अमोनियम नायट्रेटचा साठा हलविला !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लेबनॉनचे बैरुत शहर अमोनियम नायट्रेटच्या महाभयंकर स्फोटांनी हादरले होते. यामध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताच्या चेन्नई शहरातही एका गोदामामध्ये असाच काहीशे टन अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचे समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून साठा इतरत्र हलविण्यात आला आहे.

चेन्नईतील स्फोटक केमिकलचा ई-लिलाव झाला असून हा साठा आता हैदराबादला पाठवण्यात येत आहे. चेन्नईत हा अमोनियम नायट्रेटचा साठा जिथे होता, त्याच्या आसपास जवळपास 12 हजारची लोकवस्ती आहे. एका कंटेनरमध्ये 697 टन केमिकल ठेवण्यात आले होते. केमिकलने भरलेले काही कंटेनर आधीच हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन उर्वरित केमिकलही कार्गोने पाठवण्यात येईल असे सांगितले आहे.

कस्टम कायदा 1962 अंतर्गत 2015 साली हा केमिकलचा पदार्थ जप्त करण्यात आला होता. चेन्नईपासून 20 किमी अंतरावर असलेल्या फ्राईट स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेटन भरलेले कार्गो ठेवण्यात आले होते.तामिळनाडूतील एका आयातदाराकडून हे केमिकल जप्त करण्यात आले होते. त्याने रासायनिक खत पदार्थ असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात तपासणीमध्ये स्फोटक केमिकल निघाले असे कस्टमच्या अधिकार्‍यांनी सांगितले.