Beirut : स्फोटानंतर बैरूतमध्ये आंदोलन पेटलं, मंत्र्याचा राजीनामा तर आंदोलक जखमी

पोलीसनामा ऑनलाइन – बैरुत बंदरात मंगळवारी झालेल्या स्फोटानंतर लेबनॉनमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेटसाठी भ्रष्टाचार आणि यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष पणा जबाबदार असल्याचे म्हणत नागरिकांनी सरकारविरुद्ध आंदोलन सुरु केलं आहे. रविवारी हजारो लेबनॉन नागरिकांनी संसदेबाहेर निदर्शने केली. स्फोटात संपूर्ण बैरुत बंदर उद्धवस्त झाले असून या परिसरातील इमारती कोसळल्या आहेत. स्फोटात आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला असून पाच हजारांवर नागरिक जखमी झाले आहेत. तर तीन लाख नागरिक बेघर झाले आहेत.

दरम्यान, नागरिकांचा सरकारविरोधात वाढता रोष पाहता लेबनॉनच्या माहिती मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. माहिती मंत्री मनल अब्दुल समद यांनी म्हटलं की, जनतेच्या अपेक्षा आपण पूर्ण करु शकलो नाही. काही बदल होणे अपेक्षित होते, पण ते शक्य झाले नसल्याने त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात सांगितलं आहे. तसेच माहिती मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर आता पर्यावरण मंत्री सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. या राजीनाम्यांमुळे पंतप्रधान हसन दियाब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यातच त्यांनी आपल्या कारभाराची सूत्रे हाती घेतली होती.

एक पोलीस मृत्युमुखी
बैरुतमध्ये सुरु झालेल्या आंदोलनाला वळण लागले असून, आंदोलक आणि पोलिसात झटापट झाली आहे. त्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. आधीपासूनच आर्थिक स्थिती खालावल्याने नागरिकांमध्ये सरकारविरुद्ध रोष होता. त्यातच ही स्फोटक घटना घडली. म्हणून नागरिक आपला रोष व्यक्त करत आहेत.

बैरुत स्फोटप्रकरणी १९ जण अटकेत
सीमा शुल्क विभागाचे महासंचालक बद्री डाहर, माजी संचालक चाफिक मरही आणि बैरूत पोर्ट ट्रस्टचे महासंचालक हसन कोरयतेम यांच्यासह १९ जणांना या भीषण स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंदरात झालेल्या स्फोटानंतर तातडीने चौकशी सुरू करण्यात आली. त्या अनुषंगाने सीमा शुल्क आणि बंदर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली.