दुर्दैवी ! सख्ख्या भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – चेंडू काढण्यासाठी घरासमोरील विहिरीत उतरलेल्या दोघा सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. मजगाव (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी (दि. 9) दुपारी 3 वाजता ही घटना उघडकीस आली. दोघा सख्ख्या भावांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने मजगावसह बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आनंद अडव्याप्पा हणबर (वय 13) आणि आकाश अडव्याप्पा हणबर (15, रा. कलमेश्वरनगर, मजगाव) अशी मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. उद्यमबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद व आकाश हे घरासमोर बॉलने खेळत होते. यावेळी घरासमोरच असलेल्या अरुंद विहिरीत बॉल पडला. तो काढण्यासाठी आनंद हा पाईपवरून विहिरीत उतरला. खाली गेल्यानंतर त्याचा श्वास गुदमरला. यामुळे तो आरडाओरडा करू लागल्याने मोठा भाऊ आकाश हादेखील पाईपवरून खाली उतरला; परंतु अरुंद विहीर आतील अंधार यामुळे दोघांचाही जीव गुदमरला अन् ते विहिरीत पडले. आजूबाजूला कोणीच नसल्याने ते पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. काही वेळानंतर घरच्यांनी शोधाशोध सुरु केली असता दोघांचे चप्पल विहिरीवर दिसले. त्याचा अंदाज घेऊन विहिरीत डोकाऊन पाहिले असता दोघांचे मृतदेह आढळले. पोलिस निरीक्षक दयानंद शेगुणशी तपास करीत आहेत.