मराठी आणि कानडी ‘वाद’ चिघळला, कोल्हापूरात शिवसेनेनं ‘बंद’ पाडला कन्नड चित्रपट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी-कानडी वाद जास्त चिघळला असून बेळगावमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यानंतर याचे पडसाद कोल्हापूरात उमटले आहेत. शिवसैनिकांनी आक्रमक होत अप्सरा थिएटर येथे सुरु असलेल्या ‘अवणे श्रीमनारायन’ हा कन्नड चित्रपट थेटरमध्ये घुसून बंद पाडला. कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागातील वादाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसू लागले आहेत.

भीमाशंकर पाटील यांची गोळ्या घालण्याची भाषा, माजी मंत्री बसवराज यांचे वादग्रस्त वक्तव्यानंतर, बेळगावमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्यानंतर कोल्हापूरमध्ये बसस्थानकावर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा पुतळा जाळण्यात आला. विशेष म्हणजे कर्नाटकच्या एका नागरिकाच्या हातून हा पुतळा जळण्यात आल्याने बसस्थानकावर काहीवेळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, मध्यरात्रीपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पोलिसांच्या आदेशानुसार ही सेवा बंद ठेवण्यात आली असून पुढील आदेश मिळेपर्यंत बस सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावरून कन्नड संघटनांनी बेळगावमध्ये गोंधळ घातला. यावेळी कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन कले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यानंतर कोल्हापूरमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यडियुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले आणि पुतळ्याला काळी शाई फासली. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप करत युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर काही कार्यकर्त्यांनी बसेसवर दगडफेक केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/