संजय राऊतांच्या सभेचा बेळगाव प्रशासनाला धसका; स्टेजची केली मोडतोड

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल झाले आहेत. पण बेळगाव प्रशासनाने संजय राऊत यांच्या सभेचा धसका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश अंगडी यांचे निधन झाले होते. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. येत्या 17 एप्रिलला मतदान होणार आहे. तत्पूर्वी बेळगावात संजय राऊतांची प्रचारसभा होणार आहे. पण ही सभा होण्यापूर्वीच बेळगाव प्रशासनाने सभेला विरोध करत व्यासपीठ आणि साऊंड सिस्टमची मोडतोड करण्यास सुरुवात केली आहे. बेळगाव प्रशासनाकडून संजय राऊत यांच्या सभेच्या व्यासपीठाची मोडतोड केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटले, की ‘बेळगावात उतरलोय. कर्नाटक सरकारकडून दडपशाहीला सुरुवात. संयुक्त महाराष्ट्र चौकातील सभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बांधलेले व्यासपीठ तोडले…सभा होणारच! गोळ्या चालवल्या तरी हरकत नाही. ही अस्मितेची लढाई झालीये’.