बेळगाव : देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केलयं – शुभम शेळके

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बेळगाव लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि. 17) मतदान होत आहे. निवडणुकीत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी लढत होत आहे. दरम्यान जे आमच्याविरोधात प्रचारासाठी बेळगावात आले त्यांनी स्वत:ला महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिध्द केल्याचा टोला महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. तसेच जोपर्यंत सीमावासियांचा प्रश्न सुटत नाही. त्यांच्यावरील अन्याय थांबत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समिती शर्थीचे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेळकेंनी दिली आहे.

शुभम शेळकेंनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेळके म्हणाले की, कर्नाटकात मराठी माणसांची गळचेपी होते. येथे भगव्या झेंड्याची विटंबना होते. त्यामुळे येथील सरकारविरोधात मराठी माणसात चीड आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सामील होणे हे आमचे ध्येय आहे. लाल पिवळ्या झेंड्याचा वचपा काढण्यासाठी भगवा झेंडा फडकावणे ही संधी निवडणुकीच्या माध्यमातून मराठी माणसाला मिळाल्याचे ते म्हणाले. बेळगाव प्रश्नाशी काँग्रेस अन् भाजपाला देणेघेणे नाही. तसेच ज्यावेळी महाराष्ट्रात फडणवीस सरकार होते. तेंव्हा आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी साडे चार वर्ष लागली. त्यामुळे फडणवीसांकडून आम्हाला अपेक्षा नाहीत. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा करत नाही. सध्या त्यांच्या प्रचारात एकही जुने पदाधिकारी दिसत नाही. येथील मराठी माणूस भाजपाला मतदान करतो. ही मत कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार उभा करण्याचे काम काहीनी केल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता.