देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका, म्हणाले – ‘काँग्रेसला जिंकवणं हाच संजय राऊतांचा अजेंडा, बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार’

बेळगाव, ता. १६ : पोलीसनामा ऑनलाइन : बेळगाव लोकसभेच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. भाजपा, काँग्रेससोबत महाराष्ट्र एकीकरण समितीनेही या निवडणुकीत उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे या भागातील निवडणुक फार चुरशीची होणार आहे. शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला पाठिंबा देत पक्षाच्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला लावला. बेळगावात सुरु असलेल्या या प्रचाराच्या निमित्ताने शिवसेना-भाजपा पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी बेळगावात जाऊन केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. फडणवीस बेळगावात प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी ते म्हणाले, की “महाराष्ट्र एकीकरण समिती कधीही लोकसभेसाठी उमेदवार उभा करत नाही. सध्या त्यांच्या प्रचारात एकही जुने पदाधिकारी दिसत नाही. इथला मराठी माणूस भाजपाला मतदान करतो. ही मतं कमी करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा स्पॉन्सर्ड उमेदवार उभा करण्याचं काम काही लोकांनी केले आहे,” असा आरोप फडणवीसांनी केला.

इथं काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांचा अजेंडा सध्या काँग्रेसला जिंकवणं एवढाच आहे. त्यासाठी बेळगावात प्रचाराला आले. पोटनिवडणुकीत एक वरिष्ठ नेत्याचं निधन झालं आहे. त्यांची पत्नी याठिकाणी उभी आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाही हे माहिती आहे. त्यांनी कधी लोकसभा निवडणूक लढवली नाही. अलीकडच्या काळात शिवसेना काँग्रेस यांची जवळीक वाढली आहे. मुंबईत शिवसैनिक टीपू सुलतान जयंती साजरी करतात तर इथं काँग्रेस टीपू सुलतान जयंती साजरी करते. त्यामुळे टीपू सुलतान जयंती साजरी करणाऱ्यांना जिंकवण्यासाठी संजय राऊत बेळगावात प्रचाराला आले होते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.

आम्ही हिटलरचे बाप आहोत – शिवसेना खासदार संजय राऊत

बेळगावबद्दल बोलताना, काँग्रेसने, पंडीत नेहरुंनी चूक केलीय, तुम्ही दुरुस्त करा. त्या काश्मीरमध्ये पंडित नेहरुंनी कलम ३७० लावले, ती चूक तुम्ही दुरूस्त केलीच ना. मग, ही चूकही तुम्ही दुरूस्त करा, असे आवाहन खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले होते. तसेच, माझं आणि कर्नाटक सरकारचं भांडण नाही, कारण त्यांच्या हातातच काही नाही. ज्यांचं मुख्यमंत्रीपद ते ठरवतात त्यांच्या हातात काय आहे, हा लढा केंद्र सरकारशी आहे. तुम्ही न्यायाची बाजू घेत असाल तर, मराठी जनतेचं, मराठी अस्मीतेचं, महाराष्ट्राच्या एकीकरणाचं हे विराट दर्शन पाहा, असे म्हणत राऊत यांनी बेळगावमधील गर्दीकडे हात दाखवून लक्ष वेधलं. तसेच, लोकशाही मानत असाल तर न्याय द्या. मी मगाशी फार चांगल्या घोषणा ऐकत होतो, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी. नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी. नाहीच चालणार, दादागिरीचा अधिकार आमच्याकडंय. आमचा जन्मच त्यासाठी झालाय शिवसेनेचा. तानाशाही तुम्ही काय करताय, आम्ही हिटलरचे बाप आहोत, बाळासाहेब ठाकरे. महाराष्ट्राने मनात आणलं, नाक दाबायचं ठरवलं तर तडफड होईल, असे म्हणत राऊत यांनी मोदींवर जबरी टीका केली होती.